मराठी कलाविश्वातील नवविवाहित जोडपं सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी सध्या चर्चेत आहे. डिसेंबर २०२५ मध्ये सोहम आणि पूजाने लग्नाच्या बेडीत अडकत चाहत्यांना सुखद धक्का दिला. लग्नाआधी काही काळ दोघे एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

लग्नानंतर पहिल्यांदाच सोहम आणि पूजाने त्यांची प्रेमकहाणी उघड केली आहे. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत या दोघांनी त्यांच्या लव्हस्टोरीसह पहिल्या प्रपोजचा भन्नाट किस्सा शेअर केला. विशेष म्हणजे, पूजाला प्रपोज करण्यासाठी थेट आदेश बांदेकर यांनी हस्तक्षेप केल्याचं सोहमने सांगितलं.
सोहम म्हणाला, “मी ९ ऑगस्ट २०२४ रोजी पूजाला प्रपोज केलं. त्याआधी आम्ही साध्या गप्पा मारत होतो आणि मला तिच्या उत्तराचा अंदाजही आला होता. त्यामुळे मी घरी सगळं सांगितलं होतं. तेव्हा बाबा अमेरिकेत होते. ते रोज सकाळी मला ‘ऑल द बेस्ट’ असा मेसेज पाठवायचे. पण १५–२० दिवस काहीच अपडेट न दिल्यामुळे बाबा अस्वस्थ झाले.”
तो पुढे सांगतो, “एक दिवस बाबांचा मेसेज आला — ‘तू मर्द असशील तर हिच्याकडून हो म्हणवून घे. मुलगी चांगली आहे. तुझ्या टेंटेटिव्हनेसमध्ये तिला गमावू नकोस; नाहीतर मीच तिच्याशी बोलेन!’ हा मेसेज वाचून मी अक्षरशः हललो.”
पूजाच्या वाढदिवशी सोहम तिला फक्त डिनरला घेऊन जाणार होता. मात्र आई आणि चुलत बहिणीने त्याला अजूनच प्रोत्साहन दिलं. “आजच तिला विचार,” असं त्यांनी सांगितलं. अखेर डिनरदरम्यान सोहमने पूजाला प्रपोज केलं आणि पूजानेही ‘हो’ म्हणत त्याच्या प्रेमाला होकार दिला.
आदेश बांदेकरांच्या एका स्पष्ट संदेशामुळे सुरू झालेली ही प्रेमकहाणी आज लग्नापर्यंत पोहोचली असून, सोहम–पूजाची जोडी चाहत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहे.
Leave a Reply