मतदार यादीतील गोंधळ; अभिनेत्री निवेदिता सराफ यांना मतदानासाठी तासभर चकरा

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान विलेपार्ले येथे मतदार यादीतील गोंधळाचा प्रकार समोर आला. प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तब्बल एक तास मतदान केंद्रावरून केंद्रावर चकरा माराव्या लागल्या. या प्रकारामुळे त्यांनी निवडणूक यंत्रणेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

सराफ यांनी सांगितले की, “मी मतदान केंद्रावर गेले असता मतदार यादीत माझे नावच नव्हते. त्यानंतर मला २५ नंबरच्या केंद्रावर पाठवण्यात आले. तिथे माझे नाव सापडले, मात्र सिरीज नंबरच लिहिलेला नव्हता.” पुढे त्या म्हणाल्या, “सगळ्या सोसायट्यांचे गट ठरवून त्या-त्या मतदान केंद्रात मतदान करायचे असते, मग आमच्या इमारतीची नावे यादीत का नाहीत?”

दरम्यान, संबंधित मतदान केंद्रावर पोहोचण्यापूर्वीच निवडणूक कर्मचारी निघून गेल्याने मतदानात आणखी अडथळे आले. “मोबाईल आतमध्ये नेण्यास परवानगी नसल्यामुळे मी या गोंधळाचा फोटोही काढू शकले नाही,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

या घटनेमुळे मतदार यादीतील त्रुटी आणि निवडणूक व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, सामान्य मतदारांनाही अशाच अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची चर्चा आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *